Friday, October 25, 2013

"हंबरून वासराले ..."

      हल्ली माझ्या ऐकण्यात एक कविता आली,"हंबरून वासराले..." कविता ऐकताच एक हळवी जाणीव मन व्यापून टाकते.कारण या कवितेचा आशयच खूप हळवा आहे.आपल्या आईविषयी वाटणारे प्रेम,तिने केलेल्या काबाड कष्टांची जाणीव आणि त्यातून तिच्या विषयी असणारी कृतज्ञता,आईला बापाकडून मिळणाऱ्या वागणुकीचे दुःख सारेच कवीने सोप्या आणि तरल भाषेत वर्णलिले  आहे.
        खरतर  ही हिंदी कविता आहे,जिच नारायण सुर्वेंनी मराठीत रुपांतर केल. आणि साताऱ्यातील भटक्या विमुक्त जातीतील मुलांच्या शाळेत जितेंद्र जोशी गेला असताना तेथील एका मुलाने हि कविता त्याला  ऐकवली होती.आणि तीच त्याने मुंबई पोलिसांसाठी आयोजित कार्यक्रमात सादर केली. आशयघन...भावनामय...थेट हृदयात पोहचणारी...हृदयाला भिडणारी...
       ही कविता ऑफ बिट असण्याच कारण म्हणजे ज्या पद्धतीने ती लोकांसमोर आली..आणि कमी वेळात लोकप्रिय देखील झाली.ती पद्धत.एक उत्तम कलाकृती लोकांपर्यंत आणण्यासाठी अभिनेता जितेंद्र जोशी च्या कवी मनाने केलेला प्रयत्न...
      नारायण सुर्वेंनी हिंदीतून मराठीत रुपांतर करतानाही कवितेचा आशय सांभाळतानाच,नागपुरी भाषेचा लहेजा सुंदर जपला आहे...त्याचा परिपूर्ण वापर केला आहे.
      आपल्या आई बद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना कवी सभोवताली दिसणाऱ्या दृश्याची मदत घेतात.दैनंदिन  जीवनात घडणाऱ्या गोष्टी कवींना कशी आपल्या आई ची आठवण करून देतात याचे वर्णन म्हणजे ही कविता!
     कवी म्हणतात, आपल्या वासराचे लाड करणाऱ्या आपल्या मुक्या हालचालींतून आपल्या वासारावरची  माया व्यक्त करणाऱ्या गाई मध्ये मला माझी आई दिसते.
 दुष्काळात जेव्हा दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती तेव्हा पिठामध्ये पाणी टाकून तीन्हे माझी  भूक भागवली होती.आणि हातात काही नसताना ज्या पीठाने आम्हास तगवले त्या पिठात मला माझी अन्नदात्री आई दिसते.
    अनवाणी पायाने रान पालथे घालून ,रानातल्या काट्याकुट्या वेचून दोन पैसे कमावणारी माझी आई...दारूच्या नशेत गर्क माझ्या बापाने माझ्या आईला कित्येकदा मारले होते.तेव्हा माझी गरीब आई थर थर कापत असायची...तिला धाप लागायची परंतु निमूट ती सार सहन करत राहिली...आणि जेव्हा कसायाच्या दावणीला बांधलेली गाय मी पाहतो तेव्हा मला माझी काबाडकष्ट करणारी,गरीब,सोशिक आई आठवते.
     माझ्या बापाने कैकदा माझ्या आई च्या मागे माझे शिक्षण थांबवून मला देखील लाव  म्हणजे घरात पैसा येईल अस टुमण लावलं असेल परंतु माझ्या आईने त्याच्याकडे दुर्लक्ष करीत मला शिकू दिल कारण मी शिकून मास्तर व्हाव अशी तिची इच्छा असावी कदाचित...आणि म्हणूनच त्या मास्तरामध्ये पर्यायी त्या स्वप्नामध्ये मला माझी आई दिसते....
   अशा अनेक प्रसंगातून आईला कवी विषयी वाटणारे प्रेम आणि कवीची आई विषयी ची कृतज्ञता प्रतिबिंबित होते...

http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=tCRsWS1ZWjQ


 हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून पाजत जाय
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता घेऊ दे हाती काम
शिकुनश्यानं कुठं मोठ्ठा मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी जवा माझा बाप
थरथर कापे आन लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय


म्हनून म्हंतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय‍


     कवितेचा भावार्थ लक्षात घेता ही कविता वाचणाऱ्या आणि ऐकणाऱ्याच्या मनात आपल्या आईच्या आठवणी नाही दरवळल्या तर अशक्य...कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात जन्मा पासून संगोपनापर्यंत आई ने जितक प्रेम, माया, काळजी, ओतलेली असते तितक इतर कोणतच नात नाही करू शकत.
आपल्या मुलांसाठी आई आपल्या इच्छा आकांक्षा यांना मुरड घालतेच परंतु आपल्या मुलांना उत्तम जीवन देता याव म्हणून ती कष्टाच्या,त्यागाच्या परिसीमा ओलांडते.तेव्हा कुठे आपलं जगण सुकर होत,जीवन उभ राहत.
    सध्या समाजात शिक्षणाने वाढत चाललेली बेगडी विचारसरणी,आयुष्यात खूप पैसा कमवण्याच्या नादात नात्यांपासून दुरावत चाललेल्या भावना,मोठ घर घेण्याच्या अभिलाषेत त्याच घरात जन्मदात्या आई वडिलांसाठी किमान थोडी जागा ठेवावी याचा विचार न करता त्यांना वृद्धाश्रमांचा मार्ग दाखवणारी, लोप पावत चाललेली सतसद विवेकबुद्धी... या पार्श्वभूमीवर ही कविता जास्त प्रभावी ठरते...अंतर्मुख करते...भावनांची घालमेल होत असतानाच विचार करायला भाग पाडते.आणि म्हणूनच ही कविता  जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे वाटते कारण सध्या खूप व्यवहारी आयुष्य जगताना भावना आणि कृतज्ञता विसरत चाललेल्या समाजाला ही कविता भावनिक हळुवार धक्का देते.ही कविता केवळ साहित्यिक कलाकृती न राहता आशयघन जागृती ठरते.
          

5 comments:

  1. या कवितेविषयी बराच घोळ घातला गेला आहे. याला कारण जितेंद्र जोशी नावाच्या कुणा गायकाने या कवितेचे मूळ सांगतांना बर्‍याच थापा मारल्या आहेत. ही कविता मुळात नारायण सुर्वे यांची नाहीच. ती हिंदीतून अनुवादीत झालेली कविताही नाही. मराठवाड्यातल्या स.द.पाचपोळ(रा.हिंगोली) नावाच्या कवीचे हे गाणे आहे. डिसेंबर २००५ च्या धुळे येथील विद्रोही साहित्य संमेलनात हे गाणे विद्रोही शाहीरी जलसा या कलापथकाने सादर केले. त्या नंतर हे गाणे दक्षिण महाराष्ट्रात खुपच लोकप्रिय झाले. हे एक लोकप्रिय लोकगीत बनल्याने याच्या कॉपीराईट इ. विषयी कोणी फारशी काळजी घेतली नाही. आता काही गायक हे गाणे चोरून त्याच्या सिडीज बनवित आहेत पण दुर्दैवाने या गाण्याच्या मूळ निर्मात्यांना याचे श्रेय देण्याचे बेमालून टाळले जात आहे. असल्या उठवळ व उचल्या लोकांपासून मराठी ब्लॉगवाल्यांनी सावध रहायला हवे. नाहीतर मराठी साहित्याचा सारा इतिहासच खोटा लिहीला जाईल.......
    स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमस्व!

    ReplyDelete
  2. माझ्यामते, ही कविताच लोकांपर्यंत विशेषतः मुंबई - पुण्यासारख्या शहरातील श्रोत्यांपर्यंत पोहचवण्याचे काम अभिनेता 'कवी' जितेंद्र जोशी यांनी केले आहे.आणि त्यांच्या या कामाचे श्रेय त्यांना देणे अनिवार्य ठरते.हां, त्यांना मूळ कवी विषयी माहिती होती का? त्यांनी कवितेचे मूळ कवी शोधण्याचा प्रयत्न केला का? हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे.परंतु स्वतः कवी असलेल्या जितेंद्र जोशींनी असा प्रयत्न केला असावा या अपेक्षेत कारण, "स्वतःची कलाकृती लोकप्रिय होते पण मूळ निर्मात्याची ओळख मात्र हरवून जाते" या भावने मागचे दुःख एक कवीच उत्तमरीत्या समजू शकतो असे माझे प्रामाणिक मत आहे.इथे जितेंद्र जोशींची वकिली न करता त्यांची 'अशीही' बाजू असू शकते एवढच मला सांगायचं.नारायण सुर्वे हयात असते तर विषयच सोपा झाला असता कारण त्यांनी स्वतःच ही गोष्ट स्पष्ट केली असती.
    राहता राहिला मी या ब्लॉग मध्ये जितेंद्र जोशी आणि नारायण सुर्वे यांविषयी लिहिण्याचा प्रश्न..तर मुळातच मुंबईतल्या श्रोत्यांपर्यंत ही कविताच जितेंद्र जोशींच्या माध्यमातून पोहचली आहे आणि ती लोकप्रिय देखील झाली.
    या कवितेविषयी इंटरनेटवर शोध घेतला तर "हंबरून वसराले...बाय जितेंद्र जोशी" असाच घेतला जातो.इतक कविता आणि जितेंद्र जोशी अस समीकरण तयार झाल आहे.माध्यमाचा प्रभाव दुसर काय?
    परंतु मूळ कवींना त्यांच्या कलाकृतीच श्रेय मिळणं खूप जास्त गरजेच आहे यावर माझ एकमत आहे.त्यामुळे केवळ जितेंद्र जोशी किंवा इतरांना दोष न लावता मूळ कवींना लोकांपर्यंत आणून त्यांना या कवितेच श्रेय मिळवून देता आल तर ते जास्त योग्य ठरेल असे माझे प्रांजळ मत आहे...

    ReplyDelete
  3. "त्या लिह्नार्याचे हात सोन्याचे " मनाला थार्यावर आणण्याच कामं हि कविता करते हे खर

    ReplyDelete
  4. जानेवारी १९९५ यावर्षी परभणी येथे ६८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले होते. त्याचे अध्यक्ष श्रेष्ठ कवी नारायण सुर्वे हेच होते. त्यांचे अध्यक्षीय भाषण खूपच सुंदर , प्रभावी झाले होते. त्यांनी त्यावेळी म्हणून दाखवलेली कविता अजून आठवते. एका कामगाराने गावाकडे लिहिलेली चिठ्ठी ; अत्यंत प्रभावित करून गेली होती. या ब्लॉग मधील त्यांनी अनुवादित केलेली कविता सुद्धा तितकीच आशयघन आहे. " हंबरून वासराले ... " हे वाचले, की पुढचा आशय लक्षात येतो. आई म्हणजे जन्मदात्री. जिच्यामुळे आपण या जगात आलो. तिची सर कोणालाही येणार नाही. अगदी परमेश्वराला सुद्धा. तुम्ही ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे काळ बदलला. तो कोणाला परत फिरविता येणार नाही; आणि त्याबद्दल ना खंत ना खेद... प्रत्येकाने काळाप्रमाणे स्वतःत बदल करून मिळालेले आयुष्य आनंदात जगणे महत्वाचे आहे. त्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे आर्थिक परिस्थिती. ती नसेल तर मात्र दुर्दैवच.
    सागर भालेराव यांच्या प्रतिक्रियेला तुम्ही उत्तर दिले आहेच.

    ReplyDelete
  5. माझ्या ब्लॉग मार्फत या कवितेच्या मुळ कवींचा विषय निघाला आणि जितेंद्र जोशींच्या कला पोहचवण्याच्या मार्गावर प्रश्न उठला म्हणून थेट त्यांचा याबाबत विचारले असता त्यांनी दिलेलं उत्तर मी इथे पोस्ट करत आहे.
    "Mi jevhaa hi kavitaa aikli tevhaa aikavnaaryaa mulaane naaraayan survenchi kavitaa mhanun malaa maahiti dili. Teechi pohochavli. Kaalaantaraanr malaa kalale ki hi lavitaa sa.da paachpol yaa vidarbhaatlyaa hingoli yethil kavichi aahe tevhaa tyaa nantar sarvatra yaachi khabardaari gheun tyaanchech naav saangitle. Parantu toparyant kavitechaa video famous zaalaa hotaa. Aso. Maazaa praamaanik prayatna kavita pohochvnyaachaa hptaa. Jo safal zaalaa. Baaki thik."

    ----इति जितेंद्र जोशी

    ReplyDelete