Friday, October 25, 2013

"हंबरून वासराले ..."

      हल्ली माझ्या ऐकण्यात एक कविता आली,"हंबरून वासराले..." कविता ऐकताच एक हळवी जाणीव मन व्यापून टाकते.कारण या कवितेचा आशयच खूप हळवा आहे.आपल्या आईविषयी वाटणारे प्रेम,तिने केलेल्या काबाड कष्टांची जाणीव आणि त्यातून तिच्या विषयी असणारी कृतज्ञता,आईला बापाकडून मिळणाऱ्या वागणुकीचे दुःख सारेच कवीने सोप्या आणि तरल भाषेत वर्णलिले  आहे.
        खरतर  ही हिंदी कविता आहे,जिच नारायण सुर्वेंनी मराठीत रुपांतर केल. आणि साताऱ्यातील भटक्या विमुक्त जातीतील मुलांच्या शाळेत जितेंद्र जोशी गेला असताना तेथील एका मुलाने हि कविता त्याला  ऐकवली होती.आणि तीच त्याने मुंबई पोलिसांसाठी आयोजित कार्यक्रमात सादर केली. आशयघन...भावनामय...थेट हृदयात पोहचणारी...हृदयाला भिडणारी...
       ही कविता ऑफ बिट असण्याच कारण म्हणजे ज्या पद्धतीने ती लोकांसमोर आली..आणि कमी वेळात लोकप्रिय देखील झाली.ती पद्धत.एक उत्तम कलाकृती लोकांपर्यंत आणण्यासाठी अभिनेता जितेंद्र जोशी च्या कवी मनाने केलेला प्रयत्न...
      नारायण सुर्वेंनी हिंदीतून मराठीत रुपांतर करतानाही कवितेचा आशय सांभाळतानाच,नागपुरी भाषेचा लहेजा सुंदर जपला आहे...त्याचा परिपूर्ण वापर केला आहे.
      आपल्या आई बद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना कवी सभोवताली दिसणाऱ्या दृश्याची मदत घेतात.दैनंदिन  जीवनात घडणाऱ्या गोष्टी कवींना कशी आपल्या आई ची आठवण करून देतात याचे वर्णन म्हणजे ही कविता!
     कवी म्हणतात, आपल्या वासराचे लाड करणाऱ्या आपल्या मुक्या हालचालींतून आपल्या वासारावरची  माया व्यक्त करणाऱ्या गाई मध्ये मला माझी आई दिसते.
 दुष्काळात जेव्हा दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती तेव्हा पिठामध्ये पाणी टाकून तीन्हे माझी  भूक भागवली होती.आणि हातात काही नसताना ज्या पीठाने आम्हास तगवले त्या पिठात मला माझी अन्नदात्री आई दिसते.
    अनवाणी पायाने रान पालथे घालून ,रानातल्या काट्याकुट्या वेचून दोन पैसे कमावणारी माझी आई...दारूच्या नशेत गर्क माझ्या बापाने माझ्या आईला कित्येकदा मारले होते.तेव्हा माझी गरीब आई थर थर कापत असायची...तिला धाप लागायची परंतु निमूट ती सार सहन करत राहिली...आणि जेव्हा कसायाच्या दावणीला बांधलेली गाय मी पाहतो तेव्हा मला माझी काबाडकष्ट करणारी,गरीब,सोशिक आई आठवते.
     माझ्या बापाने कैकदा माझ्या आई च्या मागे माझे शिक्षण थांबवून मला देखील लाव  म्हणजे घरात पैसा येईल अस टुमण लावलं असेल परंतु माझ्या आईने त्याच्याकडे दुर्लक्ष करीत मला शिकू दिल कारण मी शिकून मास्तर व्हाव अशी तिची इच्छा असावी कदाचित...आणि म्हणूनच त्या मास्तरामध्ये पर्यायी त्या स्वप्नामध्ये मला माझी आई दिसते....
   अशा अनेक प्रसंगातून आईला कवी विषयी वाटणारे प्रेम आणि कवीची आई विषयी ची कृतज्ञता प्रतिबिंबित होते...

http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=tCRsWS1ZWjQ


 हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून पाजत जाय
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता घेऊ दे हाती काम
शिकुनश्यानं कुठं मोठ्ठा मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी जवा माझा बाप
थरथर कापे आन लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय


म्हनून म्हंतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय‍


     कवितेचा भावार्थ लक्षात घेता ही कविता वाचणाऱ्या आणि ऐकणाऱ्याच्या मनात आपल्या आईच्या आठवणी नाही दरवळल्या तर अशक्य...कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात जन्मा पासून संगोपनापर्यंत आई ने जितक प्रेम, माया, काळजी, ओतलेली असते तितक इतर कोणतच नात नाही करू शकत.
आपल्या मुलांसाठी आई आपल्या इच्छा आकांक्षा यांना मुरड घालतेच परंतु आपल्या मुलांना उत्तम जीवन देता याव म्हणून ती कष्टाच्या,त्यागाच्या परिसीमा ओलांडते.तेव्हा कुठे आपलं जगण सुकर होत,जीवन उभ राहत.
    सध्या समाजात शिक्षणाने वाढत चाललेली बेगडी विचारसरणी,आयुष्यात खूप पैसा कमवण्याच्या नादात नात्यांपासून दुरावत चाललेल्या भावना,मोठ घर घेण्याच्या अभिलाषेत त्याच घरात जन्मदात्या आई वडिलांसाठी किमान थोडी जागा ठेवावी याचा विचार न करता त्यांना वृद्धाश्रमांचा मार्ग दाखवणारी, लोप पावत चाललेली सतसद विवेकबुद्धी... या पार्श्वभूमीवर ही कविता जास्त प्रभावी ठरते...अंतर्मुख करते...भावनांची घालमेल होत असतानाच विचार करायला भाग पाडते.आणि म्हणूनच ही कविता  जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे वाटते कारण सध्या खूप व्यवहारी आयुष्य जगताना भावना आणि कृतज्ञता विसरत चाललेल्या समाजाला ही कविता भावनिक हळुवार धक्का देते.ही कविता केवळ साहित्यिक कलाकृती न राहता आशयघन जागृती ठरते.
          

Friday, September 27, 2013

Off Beat दिग्दर्शकाची...' जरा हटके ' मालिका... होणार सून मी ह्या घरची !!!

                              


                   एक प्रायोगिक नाटक आणि एक " NOT So Commercial " गाणं यांची समीक्षा केल्यानंतर आता मी एक व्यावसायिक, TRP च्या खेळात  सध्या सर्वात पुढे असलेल्या आणि  मुंबई- पुण्यापासून ते पार खेडोपाड्यांत आणि महाराष्ट्राबाहेर गुजरात,हैद्राबाद सारख्या राज्य-शहरांमध्येच नव्हे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, यु .के सारख्या सातासमुद्रा पार असणाऱ्या देशांमध्येही  मराठी-अमराठी ही मर्यादा ओलांडून रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या एका  मराठी मालिकेविषयी लिहिणार आहे.
       खरतर ,मालिकेची समीक्षा करणे मनात नव्हते , परंतु माझ्या अवतीभवती वावरणारी प्रत्येक व्यक्तीच   त्या मालिकेमध्ये एवढी गुंतली गेली आहे कि निव्वळ त्यांना खिळवून ठेवणारी मालिका नक्की कशी आहे हे पाहण्यासाठी मी ती मालिका पाहू लागले आणि मालिकेच्या यशाचं  गमक ध्यानात आलं...मालिकेचे दिग्दर्शक....मंदार देवस्थळी!! एक गुणी "off  beat " दिग्दर्शक....त्यांच्या कामाचं certificate त्यांच्याच झी मराठीवर यापूर्वीच्या गाजलेल्या मालिकांनी दिले आहे.'आभाळमाया' , 'वादळवाट' सारख्या त्या-त्या वेळी सुरु असलेल्या मालिकांचा पायंडा मोडणाऱ्या आशयघन आणि शक्य तितक्या वास्तववादी मालिका त्यांनी प्रेक्षकांना दिल्या आहेत.
      आत्ता काहीकाळ मराठी वाहिन्यांपासून दूर राहिलेल्या देवस्थळीनी मराठी प्रेक्षकांना दिवसभरचा शीणवटा दूर करण्यासाठी अगदी Prime Time ला "PRIME REFRESHMENT " भेट दिली आहे..."होणार सून मी ह्या  घरची" या मालिकेच्या रुपात...
       '६ सासू असणाऱ्या घरात जर मुलगी सून म्हणून गेली तर तिची काय अवस्था होईल??' ही या मालिकेची Tag line...वर वर पाहता हल्ली एक सासू सुनेचा ड्रामा पाहणे पचत नाही तिथे '६ सासू v/s १ सून ' म्हणजे निव्वळ boredom असणार असेच वाटले होते खरे, परंतु आत्ता पर्यंत सुरु असलेला Track  पाहता, ही मालिका
  सध्या सुरु असलेल्या  मालिकांच्या  ट्रेंड पेक्षा निराळी आहे. खरतर ही मालिका लोकप्रिय होण्यामागे  या मालिकेचा साधा पण  फ्रेश लूक, outdoor  शूट, आणि  उत्तम Team  work ही कारण असावीत , अस  म्हणण्यास हरकत नाही....
             जान्हवी( तेजश्री प्रधान) आणि श्री (शशांक  केतकर ) यांच्या रुपात  बऱ्याच  काळाने एक fresh romantic जोडी छोट्या पडद्यावर भेटीस आली आहे.त्याहीपेक्षा खूप दिवसांनी मराठीत एक नवीन प्रेमकथा दाखवली जात आहे.साधी, सरळ, हसरी, समजूतदार जान्हवी तरुणांची favourite झालेय आणि  तरुणीच नव्हे तर आई-आजी या गटात मोडतील अशा सर्व वयोगटातील  स्त्रियांना श्री च्या शांत,संयमी , प्रेमळ, स्त्रीचा आदर करणाऱ्या  गुणी स्वभावाने  आणि निरागस चेहऱ्याने भुरळ घातलेय.
 
 

              जान्हवीच मध्यमवर्गीय चौकोनी  कुटुंब....पैसा आणि गरजा यांची सांगड घालताना कौटुंबिक जिव्हाळा जपणाऱ्या या कुटुंबाला बरीच  मध्यमवर्गीय कुटुंबे  " relate " करू शकतात. खाष्ट सावत्र आई (आशा चांदोरकर ) तिचा लालची- आळशी स्वभाव दाखवताना,  अंगावर आणणारी आदळा आपट-हाणामारी ,षड्यंत्र लक्षात न राहता त्यातून निर्माण होणारी विनोद निर्मिती ते वातावरण हलक फुलक करते. प्रामाणिकपणामुळे हातून गेलेली नोकरी, पायाचे दुखणे याने हतबल झालेले  परंतु स्वाभिमानी आणि आपल्या मुलीला समजून घेणारे बाबा (मनोज कोल्हटकर )...बाप लेकीच सुंदर मैत्रीपूर्ण  नात या मालिकेत दाखवल आहे आणि म्हणूनच ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. सावत्र असलेला ,शिक्षण अपूर्ण राहिलेला ,स्वतःची  जबाबदारी टाळू पाहणारा , एरवी दंगा मस्ती करणारा आणि आईच्या खोट्या वागण्याची टिंगल करणारा परंतु जान्हवीच्या बाबतीत हळवा आणि Protective असणारा पिंट्या (रोहन गुजर ) बच्चे कंपनीचा  आणि कॉलेज मधील मुलांचा लाडका होत आहे.जान्हवीच चाळीतल घर हा सेट नसून ते गोरेगावच्या एक खऱ्या चाळीतील घर आहे.या Real Location मुळे त्याचं मध्यमवर्गीय आयुष्य लोकांना खर वाटत- पटत.


            बहुधा बऱ्याच काळानंतर  दाखवली गेलेली चाळ संस्कृती , जान्हवी आणि श्रीच bus stop वर भेटण,रस्त्याने चालताना गप्पा मारण, देवळात जाणं..या साऱ्या 'Real location ' वर चित्रित केलेल्या  प्रसंगांमुळे लोकांना ही मालिका जास्त आपलीशी वाटते.मोठ मोठ्या कृत्रिम एकाच सेट वर २४/७ घडणार नाट्य पाहण्यापेक्षा ; मोकळ्या खऱ्या लोकांमधल्या locations वर घडणार नाट्य लोकांना नक्कीच भावतंय म्हणूनच या मालिकेचा प्रेक्षक वर्ग वर सांगितल्या प्रमाणे देश - विदेशात आहे.
         बरेचदा मालिकेची नायिका ही घरातच बसलेली दाखवली जाते, मात्र या मालिकेतील नायिका-जान्हवी ही बँकेत काम करते. तिचे सहकारी,supportive बॉस हे पाहताना नुकत्याच ऑफिस मधून आलेल्या प्रेक्षकांनाही   त्यांचा दिवस- आयुष्य जान्हवी सोबत relate  करता येत.ऑफिस मध्ये अतुल परचुरेनी साकारलेला विनोदी, भोळसट,supportive  बॉस ही उत्तम ! परंतु Manager चे ऑफिस Hours मध्ये आपल्या Sub - Ordinates  समोर बायको सोबत फोन वर लाडीगोडीने बोलन किंचित अति वाटत तरीही, त्यांनी साकारलेला समजूतदार बॉस प्रेक्षकांना जवळचा वाटतो..
            श्री च्या घरी असणाऱ्या त्याच्या ६ आई म्हणजे शिस्तप्रिय, तत्ववादी आजी (रोहिणी हट्टंगडी ) ,त्याची  आई (सुहिता थत्ते ), दुसऱ्यांच्या री ला री ओढणारी त्याची मोठी काकू (सुप्रिया पाठारे ),विसराळू लहान काकू (लीना भागवत) , लग्नाच्या आशेने अत्यानंद महाराजांच्या भक्ती रसात गुंग मावशी (स्मिता  सरवदे) ,आणि स्पष्टवक्ती आत्त्या (पूर्णिमा तळवलकर ) यांच्या भिन्न स्वभावांमुळे विनोद निर्मिती होते.मात्र आता त्यांच्या स्वभावान मुळे होणारी विनोद निर्मिती जरा Predictable झाली आहे. परंतु या सहा जणींचा या क्षेत्रातील अनुभव आणि नवीन कलाकारांचा उत्साह यांच्या जुगलबंदीमुळे मालिका मनोरंजक होते.     
          जान्हवीच्या मागे लग्नासाठी बळजबरी करणारा नीच प्रवृत्तीचा ,बायकांच्या बाबतीत जरा सैल असलेला अनिल (सतीश सलागरे) उत्तम रंगलाय.नकारात्मक भूमिका असूनही त्याला एक विनोदी अंग असल्याने  प्रेक्षकांना हा व्हिलन आवडतोय.
       मालिकेतील प्रत्येक लहान मोठ्या पात्राला  त्याची एक स्वतंत्र जागा बनवायला- प्रेक्षकांमध्ये ओळख व्हायला वाव देण ही देवस्थळीनची खासियत ! आभाळमाया, वादळवाट आणि आत्ता ही मालिका...तिन्हींमध्ये साधर्म्य हेच की, ती मालिका त्यातील प्रत्येक पात्रासाठी- पात्रासह  लक्षात राहते. ती केवळ मुख्य पात्रांभोवातीच नाही फिरत,तर प्रत्येक Charecter ला स्वतःच मत असत आणि म्हणूनच ते लोकांपर्यंत पोहचत. 
       देवस्थळीनच्या  मालिका स्त्री पात्राभोवती फिरणाऱ्या असतात ,परंतु स्त्री शक्ती दाखवण्यासाठी स्त्री वर अन्यायच करावा लागतो- तिला मारहाण च करावी लागते, संशयाच्या सापळ्यात अडकवाव लागत या सध्या इतर वाहिन्यांवरील मालिकांचा USP ला छेद देत देवस्थळीनी एक साधी प्रासंगिक विनोदाची झालर असलेली , प्रेक्षकांना  आपल्या  आयुष्याचा एक भाग वाटणारी, त्यांना पात्रांसोबतह relate करायला लावणारी ,निखळ मनोरंजन देणारी मालिका निर्माण केली आहे आणि म्हणूनच सर्वच स्तरातील प्रेक्षकांनी तिचे स्वागत केले आहे.
          आता ही मालिका पुढील किती काळ प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते हे मालिकेची संहिताच ठरवेल....उत्तम सुरवात झालेल्या या मालिकेने आपला दर्जा कायम ठेवावा हीच अपेक्षा!!! 
        

              

Thursday, September 19, 2013

HUSNA....A Musical Emotional Treat!!!



           पियुष मिश्रा हे अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वपरिचित आहेतच,मुख्यत्वे त्यांच्या Rockstar आणि Gangs of vaasyepur मधील अभिनयाने त्यांचा चाहता वर्ग वाढला आहे.
     त्यांना २००३ च्या झी सिने अवार्ड्स मध्ये उत्कृष्ट संवाद लेखक म्हणून "Legend  of  Bhagatsing " या  सिनेमा साठी पारितोषिक मिळाले होते.तसेच २०१०  मध्ये गुलाल या सिनेमासाठी Stardust awards मध्ये संगीत दिग्दर्शनातील उत्कृष्ट कामगिरी साठी गौरविण्यात आले.
          तर अशा या अष्टपैलू कलाकाराने लिहिलेलं,  संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं गाणं म्हणजे "हुस्ना"! खरतर १५ वर्षांपूर्वीच पियुष मिश्रांनी लिहिलेलं हे गाणं १४ जुलै २०१२ रोजी M TV Coke  Studio -2 च्या दुसऱ्या भागात हितेश सोनिक आणि मिश्रांनी  नव्याने सादर केल.
   फाळणीच्या वेळी एकमेकांपासून  कायमचे दुरावलेल्या प्रियकराने आपल्या पाकिस्तानात असणाऱ्या प्रेयसीला  पत्रात विचारलेले हळवे, भावपूर्ण प्रश्न म्हणजे हे गाणं! आयुष्यात पुढे जात असताना मनात कुठेतरी जपून ठेवलेल्या प्रेयसीच्या आठवणी, विरहाची सतत बोचत असणारी सल, आयुष्यात पुन्हा कधीच तिला ला भेटता नाही येणार...पाहता नाही येणार  यामुळे आलेली असहायता,अगतिकता शब्दांद्वारे आणि हळुवार चालीमुळे हृदयस्पर्शी ठरते...मन हेलावून टाकते...डोळ्यांच्या कडा ओलावते...

 http://lyricsdna.com/songs/lyrics/husna-coke-studio-mtv-india-piyush-mishra-hitesh-sonik#ixzz2dIR4dzdb

      आपल्या माणसांपासून दुरावल्याच दुक्ख सहन न झाल्याने जसं भारतीय दर रात्री रडतात तसेच पाकिस्तानातही होते का?? ईद च्या वेळचे नमाज,शेवय्यांची खीर...दिवाळीतला दिव्यांचा प्रकाश... बैसाखी,होळी,लोह्डी सारखे अनेक सण आजही त्या दुसरा मुल्क (देश) म्हणविल्या जाणाऱ्या पाकिस्तान  मध्ये पूर्वीसारखेच  साजरे होतात  का? या आणि अशा अनेक वेळी एका  प्रियकराने आपल्या प्रेयसी सोबत घालवलेले सुंदर क्षण आणि फाळणीनंतर त्याच क्षणांसाठी आसुसलेल्या अस्वस्थ मनाचे प्रश्न अंगावर काटा उभा करतात.    
    अतिशय सुंदर शब्दांत मांडलेली प्रियकराची व्यथा तितक्याच ताकदीच्या संगीता मुळे परिणाम साधून जाते.guitar चा आणि भारतीय वाद्यांचा घातलेला सुरेल मेळ फाळणीच्या वेळचा काळ..विरहाने होणारी दोन जीवांची घालमेल थेट हृदयापर्यंत पोहचवते. तो काळ लक्षात  घेऊनच भावना पोहचवण्यासाठी केलेला उर्दू मिश्रित हिंदीचा वापर निव्वळ  लाजवाब...
    खरे पाहता हे गाणे म्हणजे केवळ दोन प्रेमी जीवांची  मांडलेली  व्यथा नव्हे तर फाळणी मुळे एकमेकान पासून कायमचे दुरावलेल्या हिंदुस्तानची म्हणजेच फाळणी नंतरच्या भारत आणि पाकिस्तानची व्यथा आहे. फाळणीमुळे कैक घरे उध्वस्त झाली...अनेक नाती तुटली...कितीतरी लोक आपल्या  नातलगाना..प्रियजनांना कायमचे गमावून बसले..हजारो लाखो लोकांच्या सबंध आयुष्याची फाळणी झाली...आणि त्यांच्याच  विदारक्तेचे... असाह्यतेचे  प्रतिक म्हणजे हुस्ना...
       हे गाणं आशय आणि संगीत या दोन्ही बाजूनी परिपूर्ण ठरत, त्यामुळेच ते classes सोबत masses ला देखील भावत.एकाच वेळी प्रेम, दुक्ख, अस्वस्थता या भावना हे गाणं ऐकताना अनुभवायला मिळतात त्यामुळेच ते  ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करून जात एवढ निश्चित!
        
 

Thursday, September 12, 2013

'खून करायचाय !!! '


                                            


                       'खून  करायचाय  !!! '  जरा  आगळ  नाव  असणाऱ्या  या  प्रयोगाचे  सादरीकरण  NCPA  आयोजित "प्रतिबिंब"  या  नाट्यमहोत्सवात  करण्यात  आले.  "नाट्य  प्रयोग"  या  करता  म्हणतेय  कारण  दशकांचा  इतिहास  आणि  अनेक  नामवंत  कलाकारांनी  सादर  केलेली  ही  संहिता  पुन्हा  एकदा  रंगमंचावर आणण्याचे  काम 'stage  players '  च्या  तरुणांनी  उत्तमरीत्या  पार  पाडलंय.
               Stage players  यांचे  'खून  करायचाय'  हे  नाटक  म्हणजे  "sleuth "  या  मूळ नाटकाचा  मराठी  आविष्कार !  Anthony  Shaffer  लिखित , Tony  Award  winning  "sleuth "  या  नाटकाचे दिग्दर्शन Clifford Williams  यांनी  केले  होते.
        पुढे  १९७२  साली  याच  नाटकावर  आधारित  एका  चित्रपटाची  निर्मिती   झाली.   यातील  दोन अभिनेत्यांना  (Laurence  Olivier  आणि  Michael  Caine )  उत्कृष्ट  अभिनयासाठी  अकादमी  पुरस्कारांचे नामांकन  मिळाले.
               तर ,  राजवाडे  हा  एक  प्रसिद्ध  गूढ  कथाकार  आहे  आणि  त्याला  त्याच्या  या  प्रसिद्धीचा  गर्व / माज  ही आहे.  सतत  रहस्य  कथा  लिहिण्यात  गर्क  असलेल्या  राजवाडेचा स्वभावही  किंचित विचित्र  आहे. स्वतःच्या  आत्यंतिक  प्रेमात  असणाऱ्या  राजवाडेला  एका  रात्री  अजय  तळवळकर  नामक एक  तरुण राजवाडेच्या  शहराबाहेरील  एकाकी  वाड्यात  भेटायला  येतो. स्वतःच  कपड्यांचं  छोटस  दुकान  आणि struggling actor  असलेला  अजय  राजवाडेला  भेटायला  येतो  त्याच  कारण  म्हणजे - राजवाडे ची पत्नी सई. अजय हा सईचा  प्रियकर.  त्या  दोघांना  लग्न  करायचे  असल्याने  राजवाडेने  सईला  घटस्पोट  द्यावा  अशी  मागणी  अजय  करतो.
      मुळातच  स्वच्छंदी,  आत्मकेंद्री  राजवाडे चे  त्याच्या  PR  मोनिका  सोबत  affair  सुरु  असल्याने  तो हा  प्रस्ताव  तत्काळ  मान्य  करतो,  परंतु अजय  आणि  सई   राहणीमान  यातला  फरक  दाखवत  तो अजय ला  राजवाडेच्या  घरातील  वडिलोपार्जित 30 कोटी  रुपयॆ  किमतीचा  हार  चोरण्याची अट घालतो... आणि  इथून  सुरु  होतो  नाट्यमय  प्रवास... विनोदाची झालर  लेवून... रहस्यमय...खिळवणारा..
                                                     


                                                        


          केवळ  दोनच  अभिनेते   तब्बल  दोन  तास  रंगमंचावर  वावरत  असतात  परंतु  तरीही  प्रयोग रंगतदार  होतो  कारण, ) उत्तम  कथानक ,संवाद  आणि )  नवोदित  कलाकारांचा  सकस  अभिनय...          
           राजवाडेच्या  भूमिकेत  रोहन  गुजर  चपखल  बसलाय. राजवाडेचा   विक्षिप्त  स्वभाव,  माज ,अभिमानी  वृत्ती  त्याने  बारीकसारीक  क्रियाप्रतिक्रियांतून  उत्कृष्ट  साकारलेय. अमेय  बोरकर  याने साकारलेला  अजय  तळवळकर  हा  नावा  इतकाच  सरळसाधा  तरुणही  उत्तम  रंगलाय. अजयनेच साकारलेला  धनावडे  कथानका ला  एक वेगळे वळण देतो. थोडक्यात, अभिनयाच्या  अनुषंगाने  प्रयोग  सशक्त ठरलाय.        
            प्रयोगात  संगीताने  खूप  महत्वाची  कामगिरी  बजावली  आहे. रहस्य  कथेला  साजेसे  रहस्य  टिकवून  ठेवणारे,  प्रेक्षकांची  उत्कंठा  वाढवणारे  संगीत  ही  प्रयोगाची  जमेची  बाजू  आहे.  मात्र,  काही  ठिकाणी  संगीत  संवादांवर  हावी  झाल्याने  संवाद  प्रेक्षकांपर्यंत  पोहचत  नाहीत. समीर  गरुड  ने  कथानक, संवाद  या  बरोबरच  नेपथ्याची  बाजू  ताकदीने  पेलली  आहे. राजवाडेची   वडिलोपार्जित  श्रीमंती  नेपाथ्यायून  प्रेक्षकांपर्यंत  पोहचवण्यात  त्याला  यश  मिळाले आहे.
           या नाटकाला  २०१२ च्या झी गौरव पुरस्कारांमध्ये एकूण ७ नामांकने आणि  सर्वोत्कृष्ट संगीत - अभिषेक हर्विन्दे ,सर्वोत्कृष्ट अभिनेता - रोहन गुजर असे दोन पुरस्कार ही मिळाले आहेत.
           थोडक्यात,  दोन  पात्रीदोन  अंकी  (नाटक)  प्रयोग  असूनही  सर्वोतोपरी  एक  उत्तम  कलाकृती  सादर  झालेय  हे  निश्चित ! खरतर  खटकण्यासारख  नाहीय  काही,  मात्र  black  outs  काही  ठिकाणी अनावश्यक  वाटले.  जर  ते  टाळता  आले  असते  कथानक  अजून  गतिमान  झाले  असते. परंतु  तेवढा  एक भाग  वगळला  तर  एका  आगळ्या  वेगळ्या  प्रयोगाचेखुनाचे  साक्षीदार  किमान  एकदातरी  होणे  MUST आहे.
             ...so be the witness of a murder mystery !